- संजय खांडेकर
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग कर्मशाळेतून देखभाल दुरुस्तीशिवाय बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मशाळेतील काही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील विविध डेपोंच्या बसगाड्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी अकोला विभागीय कार्मशाळेत येतात. सर्वसामान्य बिघाड झालेल्या बसगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी किमान तीन दिवस लागतात. अशा गाडया आरटीओ वर्गात मोडतात. तर मोठ्या प्रमाणात बिघाड असलेल्या बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी जास्त वेळ लागतो. त्यासाठी ७ ते १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. अशा गाड्या आरसी वर्गात मोडतात. गाड्या येणे, त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आणि त्यांना पुन्हा त्या डेपोकडे रवाना करणे ही निरंतर प्रक्रिया सुरू असते. अकोला विभाग कर्मशाळेत, येणाºया अनेक बसगाड्यांची देखभाल दुरुस्ती नाममात्र करून त्या पुन्हा डेपोकडे पाठविल्या जात आहेत. पर्यायाने त्या बसगाड्या पुन्हा दुरुस्तीसाठी कर्मशाळेत येत आहेत. नाममात्र दूरस्ती करून जर बसगाड्या रस्त्यावर येत असल्याने मार्ग अपघाताची शक्यता वाढली आहे. प्रवाशांच्या जीवाशी होत असलेल्या या खेळाकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान या संदर्भात अकोला विभाग नियंत्रक चेतना खिरवाळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.