पिंजर: एसटी बसगाडीचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस छोट्याशा नालीवर जाऊन धडकली. यात बसमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी कारंजा ते पिंजर रोडवरील पाराभवानी फाट्याजवळ घडली. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन प्रवाशांना मदत केली.अकोल्यावरून कारंजाकडे धावणाऱ्या एमएच ४0-८0३३ क्रमांकाच्या एसटी बसगाडीचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने, बस चालकाचे बसगाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसगाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर जाऊन धडकली. यात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. पिंजर येथील मोहन लोणाग्रे यांनी घटनेची माहिती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. सदाफळे, महेश साबळे यांच्यासह पथकाच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर पोहोचले. रुग्णवाहिकेतून काही प्रवाशांना संजयआप्पा पेद्दे यांच्या वाहनात बसवून दिले. काहींना पथकाच्या रुग्णवाहिकेमध्ये बसवून पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. या ठिकाणी जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. (वार्ताहर)
एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने किरकोळ अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 6:39 PM