- सागर कुटे
अकोला : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे; मात्र या नुकसानीतून सावरण्याचे काम एसटीची माल वाहतूक सेवा करीत आहे. मागील वर्षभरात मालवाहतुकीतून १ कोटी ३७ लाख १ हजार ७३१ रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या हाती आले आहे. सर्व बाजारपेठ ठप्प असताना, माल वाहतुकीमुळे एसटी महामंडळ मालामाल झाले आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका ऑटोरिक्षा, खासगी बससेवा यासह एसटी महामंडळालाही बसला आहे. प्रवासी वाहतूकच ठप्प असल्याने महामंडळाच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण होत आहेे. गतवर्षी ५ जूनपासून एसटी महामंडळाने मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला. एसटीच्या प्रवासी गाड्यामध्ये काही अंशतः बदल करून मालवाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. या मालवाहतुकीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या माध्यमातून वर्षभरात अकोला विभागाला १ कोटी ३७ लाख १ हजार ७३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. आतापर्यंत १६७२ ट्रकच्या फेऱ्या सोडण्यात आल्या. यासाठी ३ लाख ५६ हजार ६५२ किलोमीटर एसटी धावली. एकीकडे प्रवासी वाहतूक ठप्प असताना एसटी महामंडळाने मात्र मालवाहतुकीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक
२५
मालवाहतुकीतून मिळालेले उत्पन्न
१,३७,०१,७३१
ट्रकच्या झालेल्या फेऱ्या
१,६७२
ट्रकने गाठलेले अंतर
३,५६,६५२
मे महिन्यात मिळालेले उत्पन्न
मे महिन्यात आतापर्यंत १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी ३१ हजार ७९ किलोमीटर मालवाहतूक एसटी धावली, तर ८१ फेऱ्या झाल्या आहे.
या वस्तूंची वाहतूक
रास्त धान्य दुकानांचे धान्य, बियाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, कोकणातील आंबा देखील विविध ठिकाणी पोहोचविला आहे. त्याचबरोबर काही सिमेंट कंपन्याही एसटीच्या ट्रकचा, माल वाहतुकीसाठी वापर करीत आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाचा एसटीला फायदा
विविध शासकीय विभागामार्फत करण्यात येणाऱ्या माल वाहतुकीपैकी २५ टक्के वाहतूक एसटीच्या सेवेद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा एसटीच्या माल वाहतूक सेवेला होत आहे.