एसटी महामंडळाच्या अकोला विभागात विविध विभागांतून ८ कर्मचारी ६ महिन्यांमध्ये बदलून आले; परंतु या कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत रुजू करून घेतले जात नव्हते. पगार बंद असल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. विभाग नियंत्रक कार्यालयाच्या वारंवार चकरा मारून थकलेल्या या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उल्हास खराटे, दुर्गदास राऊत, नंदू कांबळे, विवेक इंगळे, गोकुलदास जाधव, गोपाल बोंडे या सहा कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर शुक्रवारी महामंडळाच्या अकोला विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले व उपोषणाची सांगता करण्यात आली.
भागवत यांचे प्रयत्न फळाला!
उपोषण सुरू झाल्यापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य सतीश भागवत यांनी या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. उपोषणकर्त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य सतीश भागवत यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण स्थगित केले.