- सचिन राऊत
अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकलेल्या तसेच त्यांच्या राज्यात आणि गावात जाण्यासाठी पायपीट करीत असलेल्या राज्यातील तब्बल पाच लाख ३७ हजार ५९३ मजुरांना त्यांच्या राज्यात तसेच त्यांच्या गावांच्या सीमेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम या काळात राज्य परिवहन महामंडळाने केले. ४४ हजार १०६ बसद्वारे या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले.कोरोनाचा तीव्र संसर्ग सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी पायपीट सुरू केली होती. हजारो किलोमीटर पायी प्रवास सुरू असतानाच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, जालना, अमरावती, अकोला यांसह विविध जिल्ह्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतण्यासाठी कुटुंबीय तसेच चिमुकल्यांसह पायी प्रवास करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते; मात्र याच असह्य वेदना राज्य परिवहन महामंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तब्बल ९० हजार चालक-वाहकांना एकत्रित करून त्यांच्याद्वारे तब्बल ४४ हजार १०६ बसफेऱ्यांद्वारे विविध राज्यातील स्थलांतरीत मजुरांना एसटीद्वारे त्यांच्या राज्याच्या तसेच गावाच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. त्यामुळे या स्थलांतरीत मजुरांनी त्यांच्या राज्यातील सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारने अडचणीच्या काळात दिलेल्या साथीमुळेच पुन्हा राज्यात कामासाठी परतने सुरू केले आहे. ४४ हजार बसफेऱ्यांद्वारे तब्बल पाच लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही एसटीने हे मोठे कार्य करून स्थलांतरित मजुरांना मोठा आधार दिला. या आठ राज्यातील अधिक मजूरमहाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओडिसा या आठ राज्यातील स्थलांतरीत मजूर मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. कोरोनाच्या संकटानंतर या मजुरांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविल्यानंतर गावचा रस्ता धरला होता; मात्र वाहने नसल्याने पायीच जात असलेल्या या मजुरांना एसटीने त्यांच्या राज्यात सोडले. राजस्थानातून आणले राज्यात विद्यार्थीवैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी शिकवणी वर्गासाठी राजस्थान येथील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले आहेत. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हे विद्यार्थी कोटा येथेच अडक लेले असताना त्यांना एसटी महामंडळाच्या ७२ बसद्वारे राज्यात आणण्यात आले. कोटा येथून महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात तब्बल एक हजार ४०० विद्यार्थ्यांना आणण्यात आल्याची कामगिरी एसटी महामंडळाने केली.