अकोला : कोरोनाकाळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटीची विशेष सुविधा केली होती. एसटीच्या या फेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता; मात्र त्या भत्त्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये हजारो प्रवाशी जिल्ह्याच्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर अडकले होते. कोरोनाकाळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष सुविधा केली होती. चालक-वाहकांनी या कठीण काळातही सेवा दिली. छत्तीसगड, तेलंगाना, मध्य प्रदेशातील नागरिकांना त्यांच्या गावी सोडले. यातील छत्तीसगड ८, मध्यप्रदेश ३, तेलंगाना २ बसेस सोडण्यात आल्या. अडकलेल्या प्रवाश्यांची संख्या जास्त असल्याने बसेस अहोरात्र सुरू होत्या. जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या चालक व वाहकांना शासनाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते; मात्र वर्ष उलटले असताना सुद्धा या भत्त्यापासून चालक-वाहक वंचित आहे.
लॉकडाऊनच्या काळात परराज्यात एसटीच्या फेऱ्यांवर सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये भत्ता अजूनही मिळालेला नाही. चालक-वाहकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. यावर संयुक्त बैठकीत मुद्दा उपस्थित केला आहे.
- रुपम वाघमारे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना