अकोला : बंदची तयारी सुरू असताना अकोला येथून सुटणारी बस फलाटावर लागली. यावेळी ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी एकच गर्दी केली. ही बाब आंदोलक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी आंदोलकांना याबाबत विचारणा केली असता, एका प्रवाशाला धक्काबुक्की तसेच दुसऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार मध्यवर्तीय बसस्थानकात घडला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत बंदबाबत कुठलेही निवेदन आगारप्रमुखांकडे दिले नाही. त्यामुळे बसेस बंदची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, आगार क्रमांक २ मध्ये बसेसची ये-जा सुरूच होती. काही बसेस आगारातून येत होत्या. यावेळी अकोला येथून सुटणारी बस फलाटावर लागली असता प्रवाशांनी एकच गर्दी केली. मात्र, ही बाब आंदोलक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांना खाली उतरविले. यावेळी संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना, ‘बस सोडायची नाही तर फलाटावर का लावली’, याबाबत विचारणा केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत एसटी कर्मचाऱ्याने प्रवाशाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
पोलिसांना केले पाचारण
हा प्रकार स्थानक प्रमुख यांच्या दालनाच्या पुढे घडला. यावेळी त्या ठिकाणी आगारप्रमुखसुद्धा हजर होते. बसस्थानकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस येताच वातावरण निवळले.