अकोला : राज्य परिवहन महामंडळाने २१ मे, २०२० पासून राज्यात मालवाहतूक सुरू केली. या मालवाहतुकीतून आर्थिक लाभ होत असला, तरी एसटी चालकांसाठी हे डोकेदुखी बनत आहे. एक वेळ माल घेऊन गेलेली गाडी ५-६ दिवस अडकून राहत आहे. तेथून लगेच माल मिळत नसल्याचे या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
एसटीने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक मालवाहतुकीमध्ये ही दमदार सुरुवात केली आहे. सध्या एसटीकडे जिल्ह्यात २५ ट्रक तयार आहेत. त्याचबरोबर, काही जुन्या बसगाड्यांचे रूपांतर मालवाहू ट्रक्समध्ये करण्यात येत आहे. सध्या मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणे जिल्हा स्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून, त्यांच्यावर जिल्ह्यातील मालवाहतुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये कृषिजन्य प्रक्रिया केलेला माल, कृषिपूरक व्यवसायाशी संबंधित माल आणि शासनाच्या अन्य महामंडळाच्या गोदामातील मालाची वाहतूक प्राधान्याने करण्यात येत आहे. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी आपले दर आकारत आहे. या माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु काही दिवसांपासून ही माल वाहतूक चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जिल्ह्यातून इतरत्र माल घेऊन गेलेली गाडी ५-६ दिवस परत येत नाही. त्या ठिकाणावरून लवकर माल मिळत नसल्याने ही अडचण येत आहे.
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक
२५
वाहतूक सुरू असलेले ट्रक
१५
५०० रुपये मिळतात, पण ॲडव्हान्स
माल वाहतुकीसाठी एसटीचा ट्रक घेऊन गेलेल्या चालकांना खर्चासाठी ५०० रुपये देण्यात येतात. मात्र, तेही ॲडव्हान्स मिळतात. हे पैसे पगारातून कापण्यात येतात.
संचारबंदीच्या काळात मालवाहतुकीसाठी गेलेल्या चालकांचे जेवणाचे हाल होत आहेत. जास्त दिवस बाहेरगावी जात असल्याने सुट्टीही घेण्याची अडचण येत नाही. या चालकांना २५०-३०० पर्यंत भत्ता करून द्यावा.
- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना
महामंडळाकडून सूचना; मात्र अंमलबजावणी नाही!
एका विभागाच्या मालवाहतुकीचे वाहन अन्य विभागांत गेल्यास कर्मचाऱ्यांना २ दिवसांपेक्षा जास्त थांबवू नये, अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून राहावे लागते, तसेच त्या ठिकाणी राहण्याची व नाश्ता/जेवणाची व्यवस्था केली जात नाही.