अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १,३०० बस चेचीसची खरेदी झाली आहे. तीन वर्षांनंतर नव्यानेच खरेदी केलेल्या या बस चेचीसमध्ये लालपरी, नॉन एसी स्लीपर आणि शिवशाहीचा समावेश आहे.खरेदी केलेल्या नवीन बस चेचीस सोलापूर आणि कोल्हापूरच्या विभागीय कार्यशाळेत दाखल झाल्या असून, अकोला विभागात थेट नवीन बसगाड्या येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लालपरी बसेससाठी ७००, नॉन एसी स्लीपरसाठी २०० आणि शिवशाहीसाठी ४०० चेचीस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध विभागीय कार्यशाळेत, बसगाड्या दाखल होत असून, अकोला विभागालादेखील त्याचा लाभ होणार आहे. गत तीन वर्षानंतर एसटी विभागाने मोठी खरेदी केली असून, कोल्हापूर, सोलापूर, पेण (रामवाडी) मध्ये नव्याने दाखल झालेल्या चेचीसचे स्वागत झाले आहे. राज्यातील काही विशिष्ट विभागीय कार्यशाळेतील तपासणीनंतर चेचीसची बांधणी केली जाणार आहे. त्यानंतर या बसगाड्या राज्यातील विविध आगारातून मार्गांवर धावणार आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ७१ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, एवढ्यात जेवढे बदल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले, याआधी तेवढे बदल कधीच झाले नाही. त्यामुळे राज्याची एसटी आता कात टाकून धावणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.