अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एसटी महामंडळाने परराज्यातील प्रवासी बस बंद केल्या होत्या. या निर्णयामुळे मध्यप्रदेश व तेलंगणातील फेऱ्यांवर परिणाम झाला होता. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता पुन्हा मध्यप्रदेशातील फेऱ्या सुरू झाल्या आहेत, तर तेलंगणा राज्यातील फेऱ्याही सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.
परराज्यात जाणाऱ्या बस
अकोला - हैदराबाद
अकोला - निजामाबाद
अकोला - आदिलाबाद
अकोला - इंदौर
हैदराबाद गाडीला प्रतिसाद
निर्बंध हटल्यानंतर हैदराबाद फेरी सुरू करण्यात आली होती; पण काही कालावधीनंतर ही फेरी बंद झाली होती. आता पुन्हा हैदराबाद बसफेरी सुरू झाली आहे. शहरातील आगार क्रमांक १ मधून ही फेरी निघते. या फेरीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
७० टक्के वाहक - चालकांचे लसीकरण पूर्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. अकोला विभागातील १,७०२ वाहक - चालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
उत्पन्नात झाली वाढ
अकोला शहरासह ग्रामीण भागातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, तसेच मध्यप्रदेशातून अकोला येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. सोबतच तेलंगणा राज्यातील हैदराबाद, निजामाबाद येथेही कामानिमित्त जाणारे प्रवासी ये-जा करीत आहेत. या मार्गावरील बस पूर्ववत झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.