नागरिकांचा बेजबाबदारपणा व प्रशासकीय यंत्रणांच्या अनास्थेमुळे शहरात पुन्हा एकदा काेराेनाच्या संसर्गाने डाेकेवर काढले आहे. शहराच्या प्रत्येक भागात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे दिसत आहे. वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने घराेघरी सर्वेक्षण करून नागरिकांच्या आराेग्य तपासणीचा निर्णय घेतला. त्यासाठी ३०७ द्विसदस्यीय पथकांचे गठन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मनपाचे शिक्षक, आशा वर्कर यांनाही कामाला लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देताना अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या काही विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदाच जन्म, मृत्यू नाेंदणी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने हा विभाग बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा स्थितीत नवजात बाळाची नाेंदणी असाे वा मृत्यू झालेल्या नागरिकांचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया खाेळंबली आहे. यामुळे गरजू नागरिकांची कुचंबणा हाेत असल्याने प्रशासनाने हा विभाग तातडीने खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पराग गवई यांनी प्रशासनाकडे केली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे नुकसान
शासनाने प्रत्येक शाळेत एकूण विद्यार्थ्यांच्या २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव केल्या आहेत. काही शाळांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता मनपा प्रशासनाने तातडीने जन्म, मृत्यू विभाग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.