लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जातींच्या कर्मचार्यांची भरती, आरक्षण, पदोन्नती, अनुशेषाबाबतच्या संपूर्ण माहितीचा धांडोळा घेत त्यातील त्रुटी, अनियमिततेप्रकरणी विधिमंडळाला अहवाल सादर करण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समिती १0, ११ व १२ जानेवारी रोजी जिल्हा दौर्यावर येत आहे. यावेळी समितीचा विभागांना भेटी देण्याचा कार्यक्रमही ठरला आहे.विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह १३ सदस्यांचा समावेश आहे. समितीच्या दोन दिवस दौर्यात विविध शासकीय कार्यालये, समाजकल्याण विभागाच्या शाळा, वसतिगृहांनाही भेटी दिल्या जाणार आहेत. कार्यालयांमध्ये झालेली कर्मचारी भरती, त्यातील आरक्षणाचे प्रमाण, पदोन्नती, जात पडताळणी, अनुशेष भरती प्रक्रियेतील संपूर्ण माहितीची पडताळणी समितीकडून केली जाणार आहे. त्यामध्ये झालेली अनियमितता, त्रुटींचा अहवाल विधिमंडळाला सादर केला जाणार आहे. त्याशिवाय, समाजकल्याण विभागाकडून चालवले जाणारे वसतिगृह, शाळांना समिती भेट देणार आहे. त्यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मिळणार्या सोयीसुविधांची माहिती घेतली जाणार आहे. समितीच्या या नियोजित दौर्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे.
या कार्यालयांची घेणार माहितीसमितीच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात १0 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. त्यानंतर कामकाजाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. त्यामध्ये दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नगर पालिका प्रशासनाकडून ठरलेल्या मुद्यांच्या माहितीसोबतच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणार्या योजनांबाबत चर्चा होईल. त्यानंतर क्रमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, महानगरपालिकेचा आढावा घेतला जाईल. दुपारी ३.३0 वाजता जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कर्मचारीविषयक, प्रकल्प कार्यालयांतर्गत मागासवर्गीय क्षेत्रात जिल्हा परिषद यंत्रणांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. सायंकाळी ५.३0 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आढावा विद्यापीठात घेतला जाईल. दुसर्या दिवशी ११ जानेवारी रोजी दुपारी जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय अनुदानित शाळा, वसतिगृह, तसेच शासन, जिल्हा परिषद यंत्रणांकडून केलेल्या योजनांच्या कामांना भेटी दिल्या जाणार आहेत. तिसर्या दिवशी सकाळी ११ वाजता पहिल्या दिवशी झालेल्या विविध विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. दुपारी २ वाजेनंतर बैठक संपणार आहे.
समितीमध्ये १३ आमदार सदस्यविधिमंडळाच्या या समितीमध्ये अध्यक्ष आमदार पिंपळे यांच्यासह सर्व आमदार लखन मलिक, डॉ. मिलिंद माने, राजू तोडसाम, प्रा. संगीता ठोंबरे, ज्ञानराज चौगुले, अहिरे, संध्यादेवी देसाई, प्रा. वर्षा गायकवाड, भाई गिरकर, प्रकाश गजभिये, प्रा.जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील यांच्यासह उपसचिव ना.रा. थिटे, अवर सचिव आनंद राहाटे उपस्थित राहणार आहेत.