शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे सिमेंट रस्त्यांची चाळण झाली आहे. जुने शहरात अत्यंत अरुंद असलेल्या डाबकी राेडवर पावसाचे पाणी साचले असून, त्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. टिळक राेडच्या दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने हाेत असल्याचे चित्र आहे. एकूणच शहरातील प्रमुख रस्त्यांची दैनावस्था झाली असली, तरीही सत्ताधारी भाजप व प्रशासनाकडून काेणत्याही उपाययाेजना केल्या जात नसल्याने सर्वसामान्य अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. हा मुद्दा उपस्थित करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी साेमवारी महापाैर कार्यालयात धडक दिली. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापाैर उपस्थित नसल्याचे पाहून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी विदर्भ प्रांत सहमंत्री अभिषेक देवर, महानगर सहमंत्री कोमल जोशी, महानगर सहमंत्री आदित्य केंदळे, देवाशिष गोतरकर, जयकुमार आडे, आदित्य पवार, उन्नत दातकर, रूपेश तलवारे, श्याम महाजन, शुभम मुरकुटे, मनोज साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुक्तांना दिले निवेदन
निवेदन स्वीकारण्यासाठी महापाैर उपस्थित नसल्यामुळे अभाविपच्या वतीने मनपा आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची आयुक्त कितपत दखल घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.