अकोला : मनपामध्ये असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने जनतेचा पैसा खर्चून शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या रस्त्यावर टॉवर चौक ते निशांत टॉवर, गांधीरोडपर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतू हा भुयारी मार्ग शहरवासियांसाठी डोकेदुखीचा ठरला असून, गत दोन महिन्यांपासून भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. सरकारने जनतेचा पैसा पाण्यात घातल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार, दि.३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
जनआक्रोश आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, जि. प. शिक्षण सभापती माया नाईक, अशोक शिरसाट, अकोला पंचायत समितीचे उपसभापती अजय शेगावकर, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, मनोहर पंजवानी, डॉ. शंकरराव राजुस्कर, नितीन गवई, पराग गवई, संजय किर्तक, सुरेंद्र सोळंके, शेख मुख्तार, देवानंद तायडे, शंकरराव इंगोले, नीतीन सपकाळ, विकास सदांशिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.‘भुयारी मार्ग जलतरण तलाव म्हणून घोषित करा!’
भुयारी मार्गामधील साचलेले पाणी बाहेर काढून हा मार्ग जनतेच्या रहदारीसाठी सुरू करावा, अन्यथा हा भुयारी मार्ग जलतरण तलाव म्हणून घोषित करावा, अशा घोषणा देत वंचितने लक्ष वेधले. संबंधित विभागाने तत्काळ भुयारी मार्गातील पाणी बाहेर काढून जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी याप्रसंगी जन आक्रोश आंदोलनात करण्यात आली.