अकाेला : सध्या काेराेनाची दुसरी लाट अतिशय घातक झाली असून, रुग्णांची संख्या वाढतीच असून मृत्यूचा दरही वाढला आहे. दुसरीकडे लसीकरण माेहिमेला तुटवड्याचा फटका बसला असल्याने लसीकरणही संथगतीने सुरू आहे. पृष्ठभूमीवर शाळा कधी सुरू हाेतील हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट हाेत चालला आहे. लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय सध्या तरी शाळा सुरू हाेणे कठीण असल्याचे चित्र स्पष्ट हाेत आहे. गेल्या मार्च २०२० पासून शाळा लाॅकडाऊन आहेत. मुलांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिक्षणातच पार पडले. दुसरे शैक्षणिक वर्षही काेराेनाच्या सावटातच सुरू झाले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मुले शाळेत गेलेच नाही. मध्यंतरी ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले हाेते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही व त्याचदरम्यान काेराेनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या त्या आजतागायत कायम आहे. आता तर दहावीच्या परीक्षाही रद्द झाल्या असून, पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांची वरच्या वर्गात ढकलगाडी सुरू केली आहे. त्यामुळे जाेपर्यंत लहान मुलांचे लसीकरण पूर्ण हाेत नाही ताेपर्यंत तरी शाळा सुरू हाेण्याची चिन्हे नाहीत, हे स्पष्टच आहे.
बाॅक्स...
२९ हजार ४१० विद्यार्थी थेट दुसरीत
काेराेनाच्या संकटामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, गेल्या वर्षी पहिल्या वर्गात दाखल झालेले विद्यार्थी दुसऱ्या वर्गात पाेहचले आहेत. या विद्यार्थ्यांनी वर्षभरात शाळा अनुभवलेलीच नाही. शाळा अंगवळणी पडण्याच्या आतच दुसऱ्या वर्गात त्यांना प्रवेश मिळाला आहे.
इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतचे २ लाख ६ हजार ५०६ विद्यार्थी हे वरच्या वर्गात ढकलल्या गेले आहेत.
आता तर दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणी पुढच्या वर्गात प्रवेश कसा राहील, यावर काथ्याकूट सुरू आहे
शिक्षणाधिकारी म्हणतात...
शाळा सुरू करण्याबाबत आणी लसीकरणाबाबतही सध्या तरी शिक्षण विभागाकडून कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाहीत. आता तर उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील सत्रात प्रवेशापूर्वी लसीकरणाची अट राहू शकते. मुलांचे आराेग्य हा प्राधान्याचा विषय असल्याने याेग्य वेळी निर्णय हाेईलच.
वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक
...................
ऑनलाईन-ऑफलाईन दाेन्ही पर्याय
पुढील शैक्षणिक सत्र सुरू हाेण्यापूर्वी काेराेनाची स्थिती कशी आहे, यावरच शाळांचे भवितव्य ठरणार आहे. ऑनलाईन-ऑफलाईन हे दाेन्ही पर्याय पालकांसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे. पाल्यांचे लसीकरण झाले तरच पालक मुलांना शाळेत पाठविण्याची शक्यता आहे.
पालक शिक्षक म्हणतात....
वर्ष झाले शाळेमध्ये गेलेलाे नाही. ऑनलाईन क्लासमध्ये शिकविल्या जाते. मात्र शाळेतील शिक्षणाचा आनंद येत नाही. आदित्य चतरकर, विद्यार्थी
शाळा सुरू व्हाव्यात असे सर्वच शिक्षकांना वाटते. मात्र विद्यार्थ्यांच्या आराेग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. लसीकरण झाले तर शाळा सुरू हाेतीलही. मनीष गावंडे शिक्षक
मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय शाळेत पाठविण्यास काेणतेही पालक तयार हाेणार नाहीत. त्यामुळे लसीकरणाची व्यवस्था त्वरेने व्हावी. रवींद्र भवाने पालक