अकोला : जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप तातडीने करण्यासाठी मंगळवारपासून खरेदी केंद्रांवर रात्रंदिवस (२४ तास) तुरीचे मोजमाप सुरू करण्यात आले. त्यासाठी खरेदी केंद्रांवर महसूल अधिकारी आणि तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने, जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. दरम्यान, तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील नाफेडद्वारे तूर खरेदीच्या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले. त्यानुसार २७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. पंचनामे करण्यात आलेल्या तुरीचे मोजमाप करून शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप २४ तास सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी १ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिला. त्यानुसार २ मेपासून जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर रात्रंदिवस (२४ तास ) तूर खरेदीचे काम सुरू करण्यात आले. महसूल व संबंधित अधिकाऱ्यांसह तलाठ्यांच्या नियंत्रणात तूर खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांवर नायब तहसीलदार, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी, तालुका उपनिबंधक आणि तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महसूल व संबंधित अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तूर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केंद्राच्या ठिकाणी २४ तास तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नायब तहसीलदार, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी व तालुका उपनिबंधकांच्या नियंत्रणात तूर खरेदी सुरू आहे. खरेदी केंद्रांवर तूर खरेदीच्या प्रक्रियेसाठी नऊ तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.-राजेश्वर हांडे,तहसीलदार, अकोला.
रात्रंदिवस तूर खरेदी सुरू!
By admin | Published: May 03, 2017 1:20 AM