..................
वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका
अकोला : मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकांना सर्दी, खोकला, घशात खवखवणे, हलका ताप येणे आदी आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. नागरिकांनी कुठल्याच लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
.................
शहरातील विविध भागात पाण्याची गळती
अकोला: शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी लिकेज असल्याने शहरातील विविध भागात पाण्याची गळती होताना दिसून येते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो, शिवाय याच माध्यमातून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होताे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
.............
रुग्ण नातेवाईकांकडून सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही गर्दी वाढली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डाच्या परिसरात शिळे अन्न तसेच इतर कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. याचा परिणाम रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावरही होत आहे.
.........................
‘ई-संजीवनी’ घरोघरी पोहोचलीच नाही!
अकोला: कोरोना काळात रुग्णालये, दवाखान्यांमधील गर्दी टाळण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे शक्य झाले; मात्र याअंतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे दिसून येते.
.................
गर्भवतींमध्ये घटले कोविडचे संसर्गाचे प्रमाण!
अकोला : वयोवृद्धांसह गर्भवतींनाही कोविडचा धोका असून, गत दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. नोव्हेंबरपासून मात्र गर्भवतींमध्ये कोविडचे प्रमाण घटल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
...........................
म्हाडा कॉलनीत कचऱ्याची समस्या
अकोला : शहरातील म्हाडा कॉलनीत कचरा संकलनासाठी घंटागाडी येते, मात्र ही गाडी पक्के रस्ते असणाऱ्या परिसरातीलच कचरा संकलित करते. दुसरीकडे ज्या भागात कच्चे रस्ते आहेत, अशा भागात ती जात नसल्याने अनेकांना कचरा व्यवस्थापनाची समस्या उद्भवत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.