अकोला : राज्यातील आणि अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधित झालेल्या बालरुग्णांची संख्या बघता, आणखी कोविड केअर सेंटर गरजेची आहेत. त्याकरिता तिसऱ्या लाटेमध्ये बालकांसाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किंवा शासनामार्फत मिळालेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ह्या गटामार्फत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, अकोला येथे एकूण ५ बालगृहे आहेत व त्यात एकूण १११ बालके प्रवेशित आहेत. त्यातील २६ मुलं -मुली एप्रिल महिन्यात बाधित झाली होती, त्या सर्व बालकांची तब्येत आता बरी झाली आहे.
काेरोनाची संभाव्य तिसरी लाट ही बालकांसाठी अतिशय घातक असल्याचे म्हटले जात आहे. तरीही भविष्यातील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी अकोला जिल्यातील बालकांसाठी स्वतंत्र कोविड तसेच आयसोलेटेड सेंटर असणे अतिशय गरजेचे आहे. त्याकरिता अकोल्यातील काही नि:स्वार्थ सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांनी पुढाकार घेत एक बाल कोविड योद्धागट स्थापन करून या गटाला शासनाने जर जागा उपलब्ध करून दिली तर त्या दिलेल्या जागेमध्ये कॉट, गाद्या, वैदयकीय सामुग्री, बालकांसाठी खेळणी, बालस्नेही वातावरण निर्मितीकरिता भिंतीवर चित्रकला तसेच आठवड्यातून एक दिवस प्रवेशित सर्व मुलांची जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी असून, आम्हाला सेवेची संधी देण्याची विनंती अविनाश देशमुख, पल्लवी कुळकर्णी, संजय सेंगर, ॲड. सुनीता कपिले, प्रीती वाघमारे, सुगत वाघमारे, डॉ. नीलेश पाटील, विजय जानी, दिनेश लोहोकार, राजू इटोले यांनी केली आहे.