गतवर्षी तेल्हारा तालुक्यातील तूर खरेदीची जबाबदारी डीएमओ कार्यालयाने खरेदी-विक्री संस्थेकडे दिली होती, परंतु संस्थेने पारदर्शकता ठेवली नाही. मोजमापाची गती खूप मंद होती, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे हक्काचे पैसे मिळण्यास विलंब झाला. यंदा पणन महासंघाने खरेदी-विक्री संस्थेला काळ्या यादीत टाकले, परंतु तूर नोंदणी व खरेदीकरिता कुठल्याही नव्या सहकारी संस्थेला जबाबदारी देण्यात आली नाही. तालुक्यातील तूर नोंदणीची प्रक्रिया त्यामुळे रखडली असून, जिल्ह्यातील इतर ठिकाणी मात्र तूर नोंदणी सुरू झाली आहे. पणन मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या सहकारी संस्थेला शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्वरित जबाबदारी देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी नोंदणी सुरू करण्याची मागणी युवाशक्ती संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. सध्या शासनाचा हमीभाव व बाजारभावामध्ये खूप तफावत असून, तेल्हारासारख्या ठिकाणी त्वरित तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच तालुक्यातील शेतकरी हा नापिकीमुळे त्रस्त झाला आहे. परिणामी तेल्हारा येथे शासनाने त्वरित तूर खरेदी केंद्राची नोंदणी सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून युवाशक्ती संघटनेचे संस्थापक भवानी प्रताप यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक भवानी प्रताप, उत्तम नळकांडे, योगेश वीचे, विजय बोर्डे, धीरज बकाल आदी शेतकरी उपस्थित होते.
तेल्हाऱ्यात नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:16 AM