सार्वत्रिक लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्यांदाच न्युमोकोकल लस दिली जात आहे. उपक्रमांतर्गत सोमवारी दीड महिन्याच्या बालकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पोलिओ प्रमाणेच शहरी व ग्रामीण भागातील विविध केंद्रांवर लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. चिमुकल्यांच्या पालकांमध्येही लसीकरणाबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले. खासगीमध्ये न्युमोकोकल ही लस महागळी असल्याने अनेकांना ते देणे परवडणारे नाही. अशा परिस्थितीत सार्वजनिक लसीकरण मोहिमेंतर्गत गरजुंना ही लस नि:शुल्क उपलब्ध होत आहे. पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांच्या म्हणजेच दीड महिन्यांच्या बालकांना न्युमोकोकल लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली आहे.
असे राहणार लसीकरणाचे तीन टप्पे
पहिला डोस - ६ आठवड्यांच्या बालकांना (दीड महिने)
दुसरा डोस - १४ आठवड्यांच्या बालकांना (साडेतीन महिने)
तिसरा डोस - ९ महिन्यांच्या बालकांना (९ महिने)
या ठिकाणी झाले लसीकरण
सर्व नागरी आरोग्य केंद्र
अंगणवाडी
प्राथमिक आरोग्य केंद्र
आरोग्य उपकेंद्र
जिल्हा स्त्री रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय
पालकांनी घ्यावी ही खबरदारी
लसीकरणानंतर, जर बाळाला काही प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्यास, एएनएम आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित करावे. बाळाला जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात न्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्युमोनियाचा धोका टाळण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर न्युमोकोकल लसीकरणास सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांच्या लसीकरणासाठी पालकांचा उत्साह दिसून आला.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण, अकोला