-------------------------
येवता शिवारात शेती गेली खरडून!
अकोला: शहरापासून जवळच असलेल्या येवता शिवारामध्ये बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. येवता येथील शेतकरी शामराव मते यांच्यासह शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्व्हे करून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
-------------
मालवाहू ट्रकला बस धडकली!
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक समोर जात असलेल्या ट्रकला बस पाठीमागून धडकल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक (एचआर ६१ सी ५६५६) जात असताना अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारी रा.प. बस क्रमांक (एम.एच. ४० एक्यू ६१५९) मालवाहू ट्रकच्या मागे जाऊन धडकली. या अपघातात बसमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, वाहतूक पोलीस संजय इंगळे यांनी धाव घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद नव्हती.
---------------------------
नाले साफ करण्याची मागणी
बाळापूर: तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांत नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी होत आहे.
--------------------
दिग्रस बु. परिसरात उघड्यावर शौचवारी
दिग्रस बु.: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर शौचवारी होत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
-------------
आलेगाव परिसरात दमदार पाऊस
आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरातील पेरणी आटोपली असून, जुलैच्या सुरुवातीला पावसाअभावी पिके संकटात सापडली आहेत. आता परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने पिके बहरली आहेत.
----------------
गावातील पथदिवे दुरुस्तीची मागणी
अकोला: यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. आता रात्रीच्या सुमारास विजेची आवश्यकता भासते. त्यामुळे बंद, नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------
घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला
बाळापूर: तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
----------------
पिकांत डवरणी, खुरपणीला वेग
अकोला: तालुक्यातील बोरगावमंजू परिसरात दमदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला असून, कपाशीच्या पिकाची वाढ होण्यासह तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी डवरणीचे फेर आणि खतांची पेरणी शेतकरी करीत आहेत.
-------------------
स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
अकोट: शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
---------------------
रुग्णसंख्या घटल्याने नागरिकांना दिलासा
पातूर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. आता हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन होत आहे.
---------------
प्रवासी निवाऱ्यांसमोर अतिक्रमण
अकोला: तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांसमोर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना उघड्यावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------
६१ जणांवर उपचार सुरू
अकोला: जिल्ह्यात ५६ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ६१ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.