अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथपाल पदाचाही समावेश आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन अर्धे आयुष्य संपले तरी राज्यातील पात्रताधारक नोकरी कधी मिळेल या आशेवर जीवन जगत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन ग्रंथपालपदाची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र, महाविद्यालयातील एवढे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढून त्यात ग्रंथपाल पदांची १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर आरक्षण, निवडणूक आचारसंहिता व इतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रिया रेंगाळली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला व परत राज्य सरकारने भरती प्रक्रियेवर निर्बंध आणले. मार्च २०२१ मध्ये या निर्बंधात शिथिलता आणत महाविद्यालयातील प्राचार्यपदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली. महाविद्यालयातील प्राचार्य पद हे एकाकी पद असून, दैनंदिन प्रशासकीय, तसेच शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने, तसेच नॅक मूल्यांकन करण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. हा निष्कर्ष लावत महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या भरतीस परवानगी देण्यात आली. मात्र, महाविद्यालयातील ग्रंथपाल पद हे प्राचार्यपदाप्रमाणे एकाकी पद असून, तितकेच महत्त्वाचे पद आहे. तरीही शासनाने ग्रंथपाल पदाच्या भरतीवर लावलेले निर्बंध उठवले नाहीत.
महाविद्यालयातील ग्रंथपालांची भरती प्रक्रिया बंद असल्याने आज उच्च शिक्षण घेऊन बसलेले पात्रताधारक हवालदिल झाले आहेत. आम्ही उच्च शिक्षण घेऊन चूक केली आहे का? असा प्रश्न आज ते विचारत आहेत. त्यांना आज वैवाहिक, आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुलाखतीची परवानगी द्यावी –
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने भरती प्रक्रियेवर निर्बंध लादले. त्यापूर्वी राज्यातील ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे, अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने केली जात आहे.
कोट –
ग्रंथपाल पद हे महाविद्यालयातील प्राचार्यांप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. हे पद एकाकी असूनही भरतीबाबत सतत दुर्लक्षित राहिले आहे. प्राचार्यपदाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी मिळते, मग ग्रंथपालांच्या पदासाठी का मिळत नाही. शासनाने प्राचार्यांप्रमाणे ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी.
- डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.