तेल्हारा : शहरातील भाजीपाला विक्रेते शेगाव नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बसून रस्त्यावर भाजीपाला विक्री करीत आहेत. यामुळे रहदारी, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, मोठा अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख असलेला आठवडी बाजार हा ठरलेल्या नियोजित जागेत सुरू करावा, अशी मागणी रिपाइंने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील टॉवर चौकपासून ते संत तुकाराम चौक, शेगाव नाका परिसरात भाजीपाले विक्रेते रस्त्याच्या बाजूस भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस खोळंबा होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे समस्या कायमची दूर करण्यासाठी तातडीने रविवारचा आठवडी बाजार नियोजित जागेत सुरू करावा, अशी मागणी रिपाइंने केली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुका गट सचिव भारत पोहरकार, अतुल सावळे, करण दारोकार, राहुल सोनोने, नीलेश पुदाखे, रामदास पळसपगार, गणेश वारकरी, अमोल सोनटक्के, भगवान वाघमारे, सै. साबिर, रमेश नगरे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.