बाळापूर : न.प. हद्दीत येणाऱ्या कासारखेड येथील स्मशानभूमीचे काम परिसरातील अतिक्रमणधारकांनी केलेल्या तक्रारीवर प्रशासनाने काम न थांबविता चौकशी सुरू असताना काम बंद पडले आहे. स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू करण्यासाठी कासारखेड परिसरातील नागरिकांनी शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी नगर परिषदेत धडक दिली. यावेळी दि. १० ऑगस्टपर्यंत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कासारखेड पावसाळ्यात मुतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ग्रामस्थांनी स्मशानभूमी शेडची मागणी केली होती. स्थानिक अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्मशानभूमी शेडला विरोध केला. यावर प्रशासनाने काम न थांबविता परिस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर काहींनी कत्राटदारास स्मशानभूमीचे काम बंद पाडण्यास भाग पाडल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. त्यामुळे काम बंद का पाडले, याचा जाब विचारण्यासाठी दि. ३० जुलैला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कासारखेड परिसरातील ग्रामस्थांनी महिलांसह मोर्चा नेला होता. यावेळी नगराध्यक्ष सै. ऐनोदीन खतिब, मुख्याधिकारी जी. एस. पवार यांनी स्मशानभूमी शेडचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर कासारखेड येथील उत्तम दाभाडे, प्रभाकर तायडे, चंद्रभान तायडे, सुनील इंगळे, विलास तायडे, सहदेव गवई, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------
...अन्यथा तीव्र आंदोलन
स्मशानभूमीला शेड नसल्याने कासारखेड येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अंत्यसंस्कारासाठी अडचण येत आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. १० ऑगस्टपर्यंत स्मशानभूमी शेडचे काम सुरू न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा कासारखेड येथील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.