लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अशोक वाटिका चौक ते जेल चौक मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक नेहरू पार्क चौकाकडून वळविण्यात आली आहे. जड वाहतुकीसोबतच इतरही वाहने नेहरू पार्क चौकाला वळसा न घालता, खंडेलवाल भवन रोडवरून हुतात्मा चौकातून जात असल्याने या चौकात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे चौकात अपघात घडत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने हुतात्मा स्मारक रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्याची गरज आहे.अशोक वाटिका चौक ते जेल चौक मार्गावर उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. या मार्गावर खोदकाम सुरू असल्यामुळे बसगाड्यांसह इतरही वाहतूक नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक मार्गे बार्शीटाकळी, पातूर, बाळापूरकडे वळविली आहे; परंतु जड वाहतुकीसह बसगाड्या नेहरू पार्क चौकाला वळसा न घालता, पाटबंधारे कार्यालयासमोरून हुतात्मा चौकात येत आहेत. त्यामुळे चौकात वाहनांची एकच गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी नियंत्रणासाठी चार पोलीस कर्मचारी नियुक्त करूनही वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटली नाही.हुतात्मा चौक लहान असल्यामुळे ट्रक, बसगाड्यांना वळसा घ्यायला बराच वेळ लागतो. त्यामुळे चारही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतुकीच्या कोंडीमुळे चौकात अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. हुतात्मा स्मारकालगतच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळाहुतात्मा स्मारकाच्या आवारभिंतीला लागूनच अनेकांनी अतिक्रमण थाटले आहे. कपडे विक्रेत्यासोबतच किरकोळ दुकानदारांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले. तसेच नेहरू पार्कच्या कॉर्नरलासुद्धा काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. जेल चौक, हुतात्मा चौकातून येणाºया वाहन चालकांना या अतिक्रमणामुळे इन्कम टॅक्स चौकातून येणारी वाहने दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे वळसा घेताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
बॅरिकेड्समुळे फुटेल कोंडी!जड वाहतूक पाटबंधारे कार्यालयाकडून खंडेलवाल भवन रस्त्यावरून थेट हुतात्मा चौकात येत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो आणि वाहन चालक चौक पार करून थांबत असल्यामुळे, तसेच या रस्त्यावरून जाणारी वाहने चालक चौकातून नेहरू पार्क रस्त्यावर वाहने घुसवित असल्याने इतर वाहन चालकांना वाहने काढताना त्रास होतो. यातून मार्ग काढण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने हुतात्मा स्मारकासमोरील फोर लेन मार्गावर बॅरिकेड्स लावावेत. त्यामुळे वाहन चालकांना नेहरू पार्क चौकाकडे जाता येणार नाही आणि वाहतुकीची कोंडीही होणार नाही.
जड वाहतूक नेहरू पार्क चौकातूनच वळवावी!४जड वाहतूक खंडेलवाल भवनासमोरून हुतात्मा चौक मार्गाऐवजी मुख्य नेहरू पार्क चौकातूनच वळवावी, हा चौक विस्तीर्ण असल्यामुळे जड वाहने येथून सहज निघू शकतात. त्यामुळे हुतात्मा चौकातील वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने लक्ष देण्याची गरज आहे.