अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढविणार्या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (प्रिंट ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावी लागणार आहे. ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल करता येतील. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर गावागावांत सरपंच पदांसाठी आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा!राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात अधिकार्यांची बैठक घेऊन, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेत, निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांतता व निर्भेळ वातावरणात पार पाडण्यासाठी गुंड प्रवृत्तीविरुध्द करावयाच्या कारवाईबाबत राज्य निवडणूक आयुक्तांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
८४२ मतदार केंद्र; ७0 निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८४२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, ७0 निवडणूक निर्णय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.