अकोला : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीमुळे एक महिना उशिरा होणार आहेत. ४ मे रोजी चारही कृषी विद्यापीठांचे संचालक शिक्षण आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तांत्रिक शिक्षण संचालक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. त्यानंतर यासंदर्भात दिशा ठरेल.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, १५ हजारांच्या वर विद्यार्थी बीएससीला आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होत असते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. टाळेबंदीचा आजचा ३६ वा दिवस आहे. यामुळे बीएससी कृषीच्या सर्व शाखेच्या परीक्षा रखडल्या आहेत. विद्यार्थ्यांचे दुसरे, चौथे, सहावे आणि आठव्या सेमिस्टरचा परीक्षा व्हायच्या आहेत. तीन सेमिस्टर सोडले तर विद्यार्थ्यांसाठी आठवे सेमिस्टर महत्त्वाचे आहे. आठवे सेमिस्टर हे विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची एक्सपिरीयन्स लर्निंग म्हणजेच अनुभव परीक्षा घेतली जाते. चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या चार वर्षात विद्यार्थ्यांनी जे फिल्डवर काम केले त्याचीही अनुभव परीक्षा असते. त्यामुळे आठव्या सेमिस्टरचे प्रत्यक्ष पेपर घेतले जात नाहीत. विद्यार्थ्यांनी फिल्डमध्ये जे चार महिने काम केले त्यावर गुण दिले जातात; परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच परीक्षा लांबल्या आहेत. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक मार्गदर्शन करीत आहे.--यूजीसी वर अवलंबून!देशातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग काय सांगते, यावर सर्व अवलंबून आहे. टाळेबंदी आणखी वाढविल्यास परीक्षा घेतल्या जाणार की नाही, हे ठरेल.--आॅनलाइन परीक्षा अशक्य!परीक्षा आॅनलाइन घेण्याचा एक विचारप्रवाह आहे; परंतु इंटरनेट सुविधा खेड्यापाड्यात किती सक्षमतेने काम करेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे आॅनलाइन परीक्षेला काहींचा विरोध आहे.-परीक्षा एकाच वेळी घ्याव्या लागतील!कोरोनाचा प्रादुर्भाव बघून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे तीन झोन पाडले आहेत. म्हणून अशा झोननिहाय या परीक्षा घेता येत नाहीत. एकाच वेळी ही परीक्षा घ्यावी लागते.-शैक्षणिक वर्ष यावर्षी जुलैपासून!३ मे रोजी टाळेबंदी उठवली तरी परीक्षेची तयारी करण्यासाठी १ महिना लागतो, म्हणजे बीएससी च्या परीक्षा जूनमध्ये होणार आहेत. त्यामुळे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष जुलै महिन्यापासून म्हणजेच एक महिना पुढे जाणार आहे. टाळेबंदी जर उठली नाही तर मात्र आताच सांगता येणार नाही.- टाळेबंदी उठल्यास परीक्षा घेता येणार आहे. तयारीसाठी एक महिना लागेल. मेच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. यूजीसी काय दिशा निर्देश देते, हेदेखील बघावे लागेल. विद्यार्थ्याना आॅनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक (शिक्षण),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
राज्यातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 2:37 PM