खेट्री : पातुर तालुक्यातील सस्ती येथील स्टेट बँकेचे एटीएम कचराकुंडी बनल्याचे पाहावयास मिळत आहे. या एटीएमवर सुरक्षा गार्ड नसल्याने मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पातुर तालुक्यातील सस्ती परिसरात सस्ती येथे एकमेव स्टेट बँकेची शाखा व एटीएम आहे. एटीएममधून परिसरातील ग्राहक रात्रंदिवस लाखो रुपयांचा व्यवहार करीत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून एटीएम कचऱ्याच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे. तसेच एटीएममध्ये लाखो रुपयांची रोकड असल्याने सुरक्षा गार्ड असणे आवश्यक आहे. परंतु संबंधित वरिष्ठांचा हलगर्जीपणा व शून्य कारभारामुळे एटीएम लावल्यापासूनच एटीएम सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी हे एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटनासुद्धा घडली होती. तरीही संबंधित विभागाला जाग आली नाही, तसेच एटीएमच्या खोलीमध्ये खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन या एटीएममधील घाण, कचरा साफसफाई करून सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
सस्ती येथील स्टेट बँकेचे एटीएम बनले कचराकुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:16 AM