अकोला : अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करणे, त्यांच्या हातात दारूच्या बाटलीचे पार्सल देण्यास प्रतिबंध असतानाही शहरातील वाइन शॉप व बीअर शॉपचे चालक, त्यांचे कर्मचारी बिनधास्तपणे दारूची विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार 'लोकमत'ने गुरुवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आला. या स्टिंग ऑपरेशनची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणार्या वाइन व बीअर शॉप चालकांना नोटीस पाठवून त्यांची विभागीय चौकशी सुरू करणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निर्णयामुळे शहरातील दारू व बीअर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ह्यलोकमतह्ण चमूने शहरातील खुले नाट्यगृहासमोरील वाइन शॉप, टिळक रोड, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी परिसरामध्ये स्टिंग ऑपरेशन केले. यादरम्यान वाइन शॉपमध्ये अल्पवयीन मुलांच्या हातात देशी व विदेशी दारूचे पार्सल देताना दारू विक्रेते आढळून आले. दारूच्या बाटल्यांचे पार्सल आणण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले. दारूच्या पार्सलमुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता बळावू शकते, याचा विचार दारू विक्रेतेही करीत नाही. नियम 'बाटलीत' बुडवून दारू विक्रेते बिनधास्तपणे मुलांजवळ दारू देऊन मोकळे होत असल्याचे स्पष्ट झाले. वाइन बारमध्येसुद्धा लहान मुलांचा दारू आणण्यासाठी व ती पोहोचविण्यासाठी वापर केला जात असल्याचेही समोर आले होते. लोकमतचे स्टिंग ऑपरेशन प्रकाशित झाल्याने शहरातील वाइन बार, वाइन व बीअर शॉप चालक व त्यांच्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनीसुद्धा स्टिंगची दखल घेत, शहरातील वाइन बार, वाइन व बीअर शॉप चालकांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाइन व बीअर शॉप चालकांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग बजावणार वाइन, बीअर शॉप चालकांना नोटीस
By admin | Published: November 08, 2014 12:15 AM