अकोल्यात डॉ. पंदेकृविचा संशोधन आढावा सुरूअकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या बी-बियाणे, नवे वाण, तंत्रज्ञानावर यंदा परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पुढच्या महिन्यात होणाऱ्या (जॉइंट अॅग्रोस्को) संयुक्त संशोधन आढावा सभेमध्ये मंथन होऊन मान्यता दिली जाते. यासाठीची तयारी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असून, येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा आढावा घेतला जात आहे.राज्यातील कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ वर्षभर संशोधन करतात. या संशोधनात नव्या तंत्रज्ञानासह शेतकरी हिताचे पिकांच्या नव्या वाणांचा समावेश असतो, तसेच शेती तंत्रज्ञानाच्या शेकडो शिफारशी यामध्ये असतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना जॉइंट अॅग्रोस्कोची प्रतीक्षा असते. यावर्षी २८ ते ३० मे यादरम्यान परभणीला जॉइंट अॅग्रोस्को होणार आहे. यासाठीची तयारी राज्यातील इतर तीन कृषी विद्यापीठासह अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे. या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेले संशोधन किंवा मागील काही वर्षापासून सुरू असलेले संशोधन जे यावर्षी पूर्ण झाले, या सर्व संशोधन, तंत्रज्ञान, शेती शिफारशींचा आढावा येथे सुरू आहे. १ एप्रिलपासून संशोधन आढवा समिती हा आढावा घेत आहे. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात व संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या अध्यक्षतेत हा आढावा सुरू आहे. प्रत्येक विषयाचे शास्त्रज्ञ येथे त्यांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण करू न ते कृषी विद्यापीठस्तरीय तज्ज्ञ समितीला पटवून देत आहे. सर्व संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर २९ एप्रिल रोजी अंतिम आढावा घेण्यात येऊन शिफारशीमध्ये सुधारणा करायची संधी दिली जाणार आहे. यानंतरच हे संशोधन राज्यस्तरीय जॉइंट अॅग्रोस्को पुढे ठेवले जाणार आहे.या कृषी विद्यापीठाने या अगोदर शेकडो शेती विकासाच्या शिफारशी राज्याला दिल्या असून, अनेक नवे वाण, संशोधन विकसित केले आहे. मागील वर्षी या कृषी विद्यापीठाच्या वाणांवर राज्यस्तरीय जॉइंट अॅग्रोस्कोमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावर्षी जास्तीत जास्त शिफारशी, संशोधन, नव्या वाणांना मान्यता मिळावी, यासाठीचे प्रयत्न कृषी विद्यापीठ करीत आहे.शास्त्रज्ञांच्या शिफारशी, नवे वाण हे जॉइंट अॅग्रोस्कोमध्ये पाठविण्यापूर्वी कृषी विद्यापीठ स्तरावर त्यांचा सूक्ष्म आढावा घेतला जातो. त्याचाच येथे आढावा सुरू आहे. डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
राज्यस्तरीय जॉइंट अॅग्रोस्को यंदा परभणीला!
By admin | Published: April 07, 2017 10:50 PM