अकोला : राज्यस्तरीय ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ यावर्षी अकोल्यात होणार असून,यामधूनच नवीन संशोधन,तंत्रज्ञानाला मान्यात प्राप्त होत असल्याने कृषी शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेल्या संशोधन, तंत्रज्ञानाचा आढावा कृषी विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार आहे.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा आढावा येत्या एप्रिल महिन्यात कृषी विद्यापीठ समितीद्वारे घेतला जाणार आहे. यामध्ये कृषी शास्त्रज्ञ त्यांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण यात केले जाणार आहे. कृषी विद्यापीठातील समितीने मान्यता दिल्यानंतरच विकसीत तंत्रज्ञान,संशोधन मांडण्याची संधी संबधित कृषी शास्त्रज्ञांना मिळणार आहे.त्यामुळे सर्वच संशोधक,शास्त्रज्ञ त्यांनी विकसीत केलेले संशोधन समितीपुढे मांडण्यासाठीची जय्यत तयारी करीत आहेत. राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, यात अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक मराठवाडा, राहुरीचे (अहमदनगर) महात्मा फुले कृषी, तर दापोलीचे (रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. या चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दरवर्षी महत्त्वाचे बियाणे व इतर संशोधन तसेच शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित करीत असतात. यात काही संशोधन अनेक वर्षांनंतर यशस्वी होते. आपल्या नावावर संशोधन असावे म्हणून, कृषी शास्त्रज्ञ अहोरात्र परिश्रम घेत असतात. विकसित केलेले हे संशोधन राज्यस्तरीय संशोधन समितीपुढे (ज्वॉइंट अॅग्रोस्को) मान्यतेसाठी मांडले जाणार आहे. हे संशोधन ज्वॉइंट अॅग्रोस्कोपुढे मांडण्यापूर्वी कृषी विद्यापीठ स्तरावर आढावा घेतला जातो.यात शास्त्रज्ञांना संशोधनाचे सादरीकरण करू न शेतकऱ्यांना कसे उपयुक्त आहे ते शास्त्रीयदृष्ट्या पटवून द्यावे लागते.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे बियाणे संशोधन केले असून, १,४०० च्यावर तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या आहेत. या उपयुक्त शिफारशींचा वापर शेतावर सुरू आहे. तेलबिया, कडधान्य, कापूस, ज्वारी व इतर बियाणे संशोधन करू न, या विद्यापीठाने देशात नावलौकिक मिळविला आहे. यावर्षीही नवे संशोधन ज्वॉइंट अॅग्रोस्को पुढे ठेवले जाणार आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले स्वत: ज्वॉंईट अॅग्रोस्कोपुर्वी घेण्यात येणाºया आढावा सभेत उपस्थित राहून डॉ.पंदेकृविस्तरावरील शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या संशोधनाची माहिती जाणून घेणार आहेत.
यावर्षी ‘ज्वॉईट अॅग्रोस्को’अकोल्यात होणार आहे.कृषी विद्यापीठाने नवीन बियाणे,तंत्रज्ञान विकसीत केले आहे.ते यात मांडले जाणार असून, नक्कीच त्याला मान्यता प्राप्त होईल असेच हे संशोधन,तंत्रज्ञान आहे.- डॉ.विलास भाले,डॉ.पंदेकृवि,अकोला.