अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी केल्याची माहिती आहे. कधीकाळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघावर दबदबा असणाºया राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्याची तयारी चालविली असून, त्याऐवजी अकोला पश्चिम व बाळापूर मतदारसंघ मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यातही अकोला पश्चिम मतदारसंघावर पक्षाची भिस्त असल्याने या मतदारसंघासाठी सर्व ताकद पणाला लावली जाणार असल्याची पक्षाच्या गोटात चर्चा आहे.राज्यात सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगणाºया काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत जिल्ह्यात पक्षबांधणीला मोठा वाव होता. आपसातील मतभेद, गटतट बाजूला सारून जिल्हा परिषद, महापालिका तसेच नगर परिषदांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सत्तास्थानी राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला संधी होती. अशा पोषक वातावरणाचा फायदा न घेता जिल्ह्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाºयांनी स्वकेंद्रित राहणे पसंत केले. जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा दबदबा असताना पक्ष नेतृत्वानेसुद्धा जुन्या-जाणत्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फारसे जवळ केले नाही. परिणामी, एकमेव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ वगळल्यास इतर मतदारसंघात पक्षाची झोळी रिकामीच राहिल्याचे चित्र दिसून येते. पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकाºयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थिती लावलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेत यासंदर्भात काही निवडक नेते व पदाधिकाºयांसोबत हितगूज केल्याची माहिती आहे.अकोला पश्चिमकडून अपेक्षा!काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे दुरावल्या गेलेले विजय देशमुख यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उषा विरक यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसच्या परंपरागत मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. या परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याची जाण राष्ट्रवादीला असून, त्यात तथ्यही आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांनी सांभाळलेली यशस्वी धुरा व अकोला पश्चिममधील पक्षबांधणी पाहता राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना अकोला पश्चिमकडून अपेक्षा असल्याचे बोलल्या जात आहे. जागा वाटपादरम्यान अकोला पश्चिम कळीचा मुद्दा राहणार असून, बाळापूरसाठी राष्ट्रवादी आग्रही राहण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार?मागील अनेक वर्षांपासून अकोला लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहावयास मिळत असला, तरी जिल्ह्यात आजही भाजपचा दबदबा कायम आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय क्षेत्र असो वा सिने नाट्यक्षेत्रात चपखल भूमिकेत बसणाऱ्या उमेदवाराबद्दल पक्षपातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.