- संजय खांडेकर
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रत्येक डेपोसाठी आता ब्रेक डाउन व्हॅन (दुरुस्ती पथक) येत असून, पहिल्या टप्प्यात ५० व्हॅन राज्य शासनाने खरेदी केल्या आहेत. प्रवासी गाडी दुरुस्तीसाठी सर्व दृष्टीने सुसज्ज अशा अद्ययावत ब्रेक डाउन व्हॅन राज्यातील निवडक विभागात पोहोचत असून, त्यात अकोला विभागाचा समावेश आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाडीला प्रवासी वाहतूक दरम्यान मार्गात कुठे अपघात झाला तर तातडीने जवळच्या डेपोची चालू स्थितीतील बस तेथे पाठवून परिस्थिती हाताळल्या जाते. नादुरूस्त बसगाडीची दुरुस्ती मार्गात करण्याचा प्रयत्न केला जातो. जर गाडीची दुरुस्ती मार्गात होत नसेल तर टोचण करून अपघातग्रस्त बसगाडी दुरुस्तीसाठी जवळच्या वर्कशॉपमध्ये आणली जाते. सोबतच पर्यायी बसगाडीतून प्रवाशांची वाहतूक नियमित केली जाते. या परंपरागत पद्धतीवर चांगला पर्याय म्हणून यापुढे ब्रेक डाउन व्हॅन महत्त्वाचे कार्य करणार आहे. राज्याच्या मार्ग परिवहन खात्याने यासाठी ५० वाहनांची खरेदी केली असून, पुढच्या टप्प्यात व्हॅनची संख्या अधिक वाढविली जाणार आहे. राज्याने खरेदी केलेल्या ५० व्हॅनपैकी प्रादेशिक पुणे विभागासाठी १०, शहर पुणे विभागासाठी १०, औरंगाबाद विभागासाठी ११, नागपूर विभागासाठी ४, नाशिक विभागासाठी ५, अमरावती विभागासाठी ५ आणि रायगड विभागासाठी ५ ब्रेक डाउन वाहन पाठविल्या जाणार आहेत. टप्प्या-टप्प्याने राज्यातील २५० एसटी डेपोसाठी स्वतंत्र ब्रेक डाउन व्हॅन देण्याचा संकल्प परिवहन खात्याचा आहे.अशी असेल ‘ब्रेक डाउन व्हॅन’अद्ययावत आणि सुसज्ज असणाऱ्या ब्रेक डाउन व्हॅनमध्ये एअर कॉम्प्रेशरपासून तर टूल बॉक्स, स्पेअर पार्ट रॅक, चेन पुली ब्लॉक, जनरेटर, नीमॅटीक गिलीसिरींग अॅण्ड गन, जॅक, व्हील टूल, ड्रिलींग मशीन, आॅइल पंप, वॉटर टँक, सर्च लाईट आदी व्यवस्था या ब्रेक डाउन व्हॅनमध्ये प्रामुख्याने राहणार आहे. त्यामुळे बहुतांश दुरुस्तीचे काम या व्हॅनद्वारे होणार आहे.- विभागासाठीची व्हॅन लवकरच रायगडहून अकोल्यात दाखल होत आहे. सर्व दृष्टीने सुसज्ज असलेल्या या व्हॅनसाठी एका स्पेशल टीमची ड्युटी लावली जाणार आहे. अपघाती घटनेत ब्रेक डाउन व्हॅन महत्त्वाची कामगिरी पार पाडेल, असे वाटते.- अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा, एसटी विभाग, अकोला.