अकोला : राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (व्होकेशनल) शिक्षक आपल्या विविध मागण्यासाठी येत्या १९ जून रोजी मुंबई येथे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. व्होकेशन टिचर्स असोसिएशनच्या झेंड्याखाली राज्यभरातील शिक्षक आझाद मैदानावर एकत्र येऊन आपल्या मागण्या शासनदरबारी रेटणार आहेत.उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनेच म्हणने आहे. हा अभ्यासक्रम १९८८ पासून सुरु असून, गत तीस वर्षात शासनाकडून अभ्यासक्रमांच्या उन्नतीसाठी कोणताही निधी दिला नसल्याने अभ्यासक्रमांची प्रगती खुंटली आहे. या अभ्यासक्रमांच्या सक्षमीकरणासाठी अनुदान देण्यात यावे, ही या आंदोलनामागची प्रमुख मागणी आहे. शासनाने २७ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या निर्णयानुसार या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक संस्थेतील संख्या दुप्पट केल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करुन विद्यार्थी संख्या पूर्ववत करण्याचीही मागणी संघटनेने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या योग्य प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ही देखील संघटनेची मागणी आहे. या शिवाय शिक्षकांच्या इतरही मागण्या असून, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.