अकोला : गेल्या साडेचार वर्षांतील केंद्रातील मोदी सरकारची व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची कामगिरी जनतेवर अन्याय करणारी आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डीझलचे सतत वाढते दर, शेतकऱ्यांच्या दररोज होणाºया आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेला भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून, ही जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे.जनसंघर्ष यात्रेत खा. अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह प्रमुख नेते यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.