अकोला: शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या पुढाकारातून आणि श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन चौधरी यांच्या संकल्पनेतून १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमामध्ये राज्यातील इतरही जिल्हे सहभागी झाले आहेत. या उपक्रमामध्ये जिल्ह्यासह राज्यातील साडेतीन हजार मुख्याध्यापक जुळल्या गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ प्राथमिक विभागातच ‘स्टडी फ्रॉम होम’ हा उपक्रम सुरू अहे. माध्यमिक विभागात हा उपक्रम राबविणारा अकोला जिल्हा एकमेव आहे. अकोल्यातील माध्यमिक विभागाच्या ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमामध्ये अकोला जिल्ह्यातील मुख्याध्यापक, विद्यार्थी नव्हे, तर राज्यातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशिम, भंडारा, बुलडाणा येथपासून तर सोलापूर, रायगड, जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापकसुद्धा या पथदर्शी उपक्रमात सहभागी झाले आहेत. जवळपास ३,५०० शिक्षक, मुख्याध्यापक या उपक्रमात सहभागी झाले आहेत आणि या उपक्रमाचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य तर सुरूच आहे. सोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहण्यास मदत होत आहे. या काळात त्यांच्या मनात सकारात्मक विचार यावे, यासाठी दररोज एक संस्कारक्षम आॅडिओ, व्हिडिओ कथासुद्धा विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे.ग्रामीण भागातही ‘टॅलेंट’ची कमी नाही!‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रम राबविताना एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की, फक्त शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही ‘टॅलेंट’ची काही कमी नाही. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा फायदा घेऊन सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्याची निर्मिती करीत आहेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डायटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमाचे उत्कृ ष्ट संचालन करीत आहेत.
अकोल्यातील ‘स्टडी फ्रॉम होम’ उपक्रमास राज्यभरातून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:04 AM