अकोला : स्थानिक एमआयडीसीच्या ट्रान्सपोर्ट नगरातील वादग्रस्त सहा भूखंडांच्या विक्रीवर पुढील आदेशापर्यंत व्यवहार न करण्याचा आदेश देत न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश एस. बनसोड यांनी ही स्थगिती दिली आहे. एमआयडीसीच्या ट्रान्सपोर्ट नगरातील सहा भूखंड वाटपात अनियमितता करून खरेदी-विक्री होत असल्याचा आक्षेप घेत त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर हा निकाल दिला गेला.वादग्रस्त सहा भूखंडांच्या प्रकरणी नीलेश नारायण मुरूमकार यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार अकोला विकास केंद्र ट्रान्सपोर्ट नगरस्थित भूखंड क्रमांक यू-५०, यू-५१, यू-५२, यू-५३, यू-५४, यू-५५ च्या वाटपात अनियमितता व फेरफार क रण्याचा आरोप होता. अमरावतीच्या विभागीय व्यवस्थापकांनी वाटप केलेल्या भूखंडावर आक्षेप आल्याने हे प्रकरण वादात सापडले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. बनसोड यांनी पुढील आदेश पारित होईस्तव कोणत्याही प्रकारचा आदेश काढण्यास मनाई केलेली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे. याप्रकरणी काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. अखिल मिश्रा यांनी युक्तिवाद केला.