- संजय खांडेकर
अकोला : अॅल्युमिनियमच्या परंपरागत जुन्या बसगाड्यांच्या तुलनेत अलिकडे येत असलेल्या स्टिल बॉडीच्या गाड्या मजबूत सिद्ध होत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता स्टिल बसगाड्या राज्यभर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अॅल्युमिनियमच्या जुन्या गाड्या हद्दपार करण्याची मोहीम सुरू झाली आहे.१९६० पासून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून सिद्ध होत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अनेक महत्त्वपूर्ण मोठे बदल सुरू केले असून, त्यात स्टिल बॉडीचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्यातील अपघाती घटनांचे अनुभव लक्षात घेता, अॅल्युमिनियम बसगाड्यांच्या तुलनेत स्टिल बसगाड्या मजबूत सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यापुढे राज्यात अॅल्युमिनियमच्या बसगाड्या न ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या दिशेने एसटी महामंडळातर्फे अॅल्युमिनियमच्या बसगाड्या हद्दपार करण्याची मोहीम तीव्र झाली आहे.राज्यातील प्रत्येक आगारातून तीन-चार बसगाड्या प्रत्येक महिन्यात मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्या जात आहे. ज्या बसगाड्यांची क्षमता आता धावण्यायोग्य राहिली नाही, अशा बसगाड्या स्क्रपमध्ये टाकण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्या जात आहेत. अकोल्यातील एकूण ४१९ बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात १० गाड्या बदलल्या गेल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने सर्वच गाड्या बदलल्या जाणार आहेत, त्यामुळे भविष्यात एसटीला अपघात झाला तरी त्यात जोखीम कमी राहण्याची शक्यता आहे.
-राज्यात यापुढे केवळ स्टिल बॉडीच्या गाड्या धावणार आहेत. त्यासाठी कालबाह्य निकामी होणाऱ्या बसगाड्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश वरिष्ठांचे आहेत. दर महिन्यात ३-४ बसगाड्या अकोल्यातून आम्ही पाठवित आहोत.-अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, एसटी विभागीय कार्यशाळा, अकोला.