डॉ. किरण वाघमारे / अकोलाआलेल्या संधीचे सोने करणे ज्याला जमते, तोच जीवनात यशस्वी होतो, हे सिद्ध केले आहे अकोल्याचे आमदार आणि विद्यमान मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी. स्टेथोस्कोप हातात घेऊन रुग्णांची तपासणी करणारा हा डॉक्टर आता मंत्री म्हणून राज्यातील जनतेच्या नाड्या तपासणार आहे. रणजित पाटलांचा सुखद राजकीय प्रवास सर्वांसाठीच आश्चर्यकारक आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी-मुंगशी या छोट्याशा गावातील असलेले रणजित पाटील व्यवसायाने हाडाचे डॉक्टर असले तरी हाडाचे शेतकरीही आहेत. आजही ते आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेतीकडे लक्ष देतात. ्त्यांचे वडील व्ही.एन. पाटील हे विधान परिषदेवर सहा वर्षे आमदार होते. लहानपणापासूनच राजकारण त्यांनी जवळून बघितले. अनेक मोठय़ा नेत्यांना अनुभवण्याची, त्यांना ऐकण्याची संधी रणजित पाटील यांना मिळाली. यातूनच त्यांची राजकारणाची जडण-घडण झाली. राजकारण अनुभवत असतानाच अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून रणजित पाटील यांनी शहरात ओळख निर्माण केली. जठारपेठेतील विठ्ठल हॉस्पिटल हे अनेक रुग्णांसाठी आशेचे ठिकाण ठरले. येथे येणार्या रुग्णाचा आजार बरा झाला पाहिजे, याला पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले. रुग्णाच्या खिशात पैसे असो अथवा नसो, त्याचे समाधान यालाच पाटील यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक भानदेखील रणजित पाटील यांनी कायम राखले. याची दखल घेत भाजपने त्यांना विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाचे तिकीट दिले.पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. कारण त्यांच्या सामना या मतदारसंघातील दिग्गज नेते व पाच टर्म आमदार राहिलेले प्रा. बी.टी. देशमुख यांच्याशी होता. पाटील यांचा हा विजय सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता.
स्टेथोस्कोप ते लाल दिवा!
By admin | Published: December 06, 2014 12:55 AM