अकाेला : स्वस्त धान्य दुकानातील गहू-तांदूळ लाभार्थ्यांना न देता त्या तांदळाची व गव्हाची साठेबाजी करून हा धान्याचा साठा तीन ट्रकमध्ये भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हिवरखेड येथे छापा टाकला.
हिवरखेड येथील मुख्य चाैकातून धान्याचा काळाबाजार हाेत असतानाही याकडे पुरवठा विभाग व ठाणेदाराचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर तीन ट्रकमधून सुमारे १५० क्विंटल गहू व १५० क्विंटल तांदूळ असा एकूण ३०० क्विंटल धान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तीन ट्रकच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून हा साठा बड्या माफियांचा असल्याची माहिती समाेर आली आहे. आकाेट उपविभागातील स्वस्त धान्य दुकानातील गरिबांचा गहू-तांदूळ हिवरखेडातील मुख्य चाैकातून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणारे माेठे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून एमएच ४३ वाय ०७७८ क्रमांकाचा माेठा ट्रक, एमएच ०४ सीयू ४९२७ क्रमांकाचा लहान ट्रक गहू व तांदळाच्या साठ्यासह जप्त केले. तर एमपी ६८ जी ०१७४ आणि एमएच २९ एटी ००३५ हे दाेन मिनी ट्रकही याच ठिकाणावर गहू व तांदळाचे पाेते भरून हा साठा काळ्याबाजारात विक्रीला नेण्यासाठी तयार हाेते. मात्र यामधील एक ट्रकचालक नसल्याने सध्या तीन ट्रक पाेलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे ३०० क्विंटल गहू व तांदूळ जप्त केले आहेत. हा गहू व तांदूळ सुमारे पाच लाख रुपयांचा असल्याची माहिती असून पाेलिसांनी या प्रकरणातील बड्या माफियांचा शाेध सुरू केला आहे. या प्रकरणी हिवरखेड पाेलीस ठाण्यात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून खऱ्या मालकाचा शाेध घेण्यात येत आहे़.
बड्या माफियांवर हाेईल का कारवाई?
गरिबांसाठी आलेला गहू व तांदूळ काळ्याबाजारात विकणाऱ्या टाेळीत अनेक बडे माफिया असून यामध्ये गुप्ता, टावरी व बजाज यांची नावे समाेर येत आहेत. मात्र पाेलिसांकडून त्यांच्यावर कठाेर कारवाई झाली नसल्याने तसेच सर्वच मिलीभगत असल्याने अशा बड्या माफियांवर कारवाई झालेली नाही. मात्र पाेलिसांनी आता अशा बड्या माफियांवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. त्यामुळे गरिबांच्या ताेंडचा घास हिरावला जाणार नाही़