अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळ वितरित करण्यासाठी ३ हजार ८० क्विंटल तूर व हरभरा डाळीचा साठा शनिवारी उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना लवकरच मोफत डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रतिमहा प्रति शिधापत्रिका एक किलो तूर किंवा हरभरा या दोनपैकी एका डाळीचे मोफत वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड एक किलो मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी ३ हजार ८० क्विंटल तूर व हरभरा डाळीचा साठा जिल्ह्यातील तालुकास्तरावर शासकीय धान्य गोदामांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना लवकरच रास्त भाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड १ किलोप्रमाणे मोफत डाळ वितरित करण्यासाठी ३ हजार ८० क्विंटल तूर व हरभरा डाळीचा साठा उपलब्ध झाला असून, लवकरच शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.- बाबाराव काळेजिल्हा पुरवठा अधिकारी