अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज पाच हजारांपेक्षा जास्त लाभार्थींना कोविड लस दिली जात आहे, मात्र सद्य:स्थितीत चार ते पाच दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावर लसीची मागणी करण्यात आली असून, वेळेवर लस न मिळाल्यास ही मोहीम खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दररोज रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोविड लसीकरण कोरोनापासून बचावासाठीचे मोठे कवच ठरत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत ४५ वर्षांवरील लाभार्थींमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच ४५ वर्षांखालील वयोगटातील लोकांना लसीकरणाची प्रतीक्षा आहे. एकंदरीत कोविड लसीकरण मोहिमेत उत्साहाचे वातावरण असताना जिल्ह्यात पाच दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आवश्यक लसीच्या साठ्याबाबत वरिष्ठांकडे मागणीदेखील करण्यात आली आहे, मात्र मागणीनुसार लसीचा साठा वेळेवर उपलब्ध न झाल्यास कोविड लसीकरण मोहीम खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी पाच हजार लाभार्थींना दिली लस
कोविड लसीकरणास लाभार्थींचा प्रतिसाद मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील पाच हजार ८३० लाभार्थींनी लस घेतली. यामध्ये पहिला डाेस ५३१८, तर दुसरा डोस ५१२ लाभार्थींनी घेतला.
कोविड लसीकरणास लाभार्थींचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी पाच हजारापेक्षा जास्त लाभार्थींना लस देण्यात आली. वाढता प्रतिसाद पाहता, लसीची आणखी आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर लसीची मागणी करण्यात आली आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम