पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : अकोट तालुक्यातील काही गावांमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ३० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर या गावात देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असलेल्या सूरज बापू सोनवणे वय २३ वर्षे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारूसाठा जप्त केला. त्यानंतर बोर्डी येथील रहिवासी अरून रूपलाल जयस्वाल वय ६५ वर्षे हा देशी व विदेशी दारूची विक्री करीत असताना त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. तसेच रामापूर येथे प्रकाश हरिभाऊ आग्रे वय ६० वर्षे हा वृद्ध देशी-विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. तर धारूर येथील महिला शीला सखाराम शिंदे हिच्याकडून देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करण्यात येत असलेला साठा जप्त करण्यात आला. या चार जणांकडून सुमारे २० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.