सोमवारी १२.३ मिमी पाऊस
अकोला : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३७.६ मिमी पाऊस झाला. सोमवार व मंगळवार सकाळपर्यंत १२.३ मिमी पाऊस झाला.
गोड मक्याला मागणी
अकोला : पावसाळा सुरू होताच बाजारात गोड मका विक्रीसाठी आला आहे. या मक्याला नागरिकांकडून मोठी मागणी होत आहे. बाजारात १० रुपयाला नग या दरात गोड मक्याची विक्री होत आहे.
वारंवार वीज खंडित
अकोला : पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणकडून वीज खंडित होण्याचे प्रकार आढळून येतात; परंतु वातावरण कोरडे असतानाही शहरातील गायत्री नगर, अयोध्या नगर, मेहरे नगर परिसरात सोमवारी सायंकाळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
सोमठाण्यापर्यंत पथदिवे लावा
अकोला : शहरातील गीता नगर पासून ते सोमठाणा गावापर्यंत पथदिवे लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. हा परिसर महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. तरीदेखील येथे या परिसरातील नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागते.
दिवसभर ढगाळ वातावरण
अकोला : काही दिवसांपासून शहर परिसरात सतत पाऊस सुरू आहे; परंतु मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक थेंब पडल्याची माहिती आहे.