पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर नाका येथे एक युवक देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करून विक्री करीत असल्याची माहितीवरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या युवकाकडून सुमारे ७० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जुने शहरातील रहिवासी अजय शिवप्रसाद भगत वय ४३ वर्षे हा बाळापूर नाका परिसरात एम एच ३० बीएच ९२४८ क्रमांकाच्या दुचाकीमधून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून अजय भगत यास ताब्यात घेतले. त्याची दुचाकी जप्त केली असता दुचाकीमधून सुमारे २० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. दुचाकी व दारू असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय भगत याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.