खेट्री: पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा उजाडे येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी चोरी करून दोन दुचाकीसह चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ मे रोजीच्या सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणातील चोरी गेलेली एक दुचाकी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चान्नी-सस्ती मार्गवरील चतारी फाट्यानजीक आढळून आली. ही दुचाकी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून चतारी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हिंगणा उजडे येथे श्रीकृष्ण जानराव उजाडे, भगवान उजाडे, स्वप्निल महादेव उजाडे, भिकाजी महादेव उजाडे, या चौघांच्या घरात चोरट्यांनी हात साफ करीत दुचाकीसह चार लाखांचा ऐवज लंपास केला होता, तसेच गणेश उजाडे यांच्या घरात चोरांना काही आढळून आले नव्हते, याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय आव्हाडे, पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वान पथक, फिंगर पथकास पाचारण केले होते; परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नव्हता. या प्रकरणातील चोरी गेलेली एक दुचाकी चोरट्यांनी चतारी फाट्यानजीक सोडल्याचे समोर आले आहे.