पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी राबविला उपक्रम
अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घडलेल्या चोरी तसेच विविध घटनांतील रोख रक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून विशेष उपक्रम राबवून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दींतील फिर्यादींना तब्बल ३४ लाख १९ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी परत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दींतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्याच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त केला आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यामध्ये ११ लाख ५५ हजार २४३ रुपये किमतीची चोरीस गेलेली १८ वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच ८ लाख ५७ हजार ०२९ रुपयांचे ७८ मोबाईल परत करण्यात आले आहे. १२ लाख १९ हजार २४३ रुपयांचे सोने व चांदीचे दागिने फिर्यादींना परत करण्यात आले आहे. यासोबतच १ लाख ८८ हजार ६३० रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण ३४ लाख १९ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो परत करण्यात आला आहे.
----------------------
नऊ महिन्यांत अडीच कोटींचा मुद्देमाल परत
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला पोलीस दलाची धुरा सांभाळल्यानंतर विविध उपक्रम राबविले. याच दरम्यान ज्या फिर्यादीना त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळत नाही, त्यांचे हेलपाटे वाचविण्यासाठी मुद्देमाल परत करण्याची मोहीम दर महिन्याच्या ३० तारखेला राबविली. या मोहिमेअंतर्गत जुलै २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना सुमारे दोन कोटी ५२ लाख ५४ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचा हा मुद्देमाल चोरीस गेल्यानंतर परत मिळाला त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अकोला पोलिसांचे आभार मानले आहेत.