अकोला: खतांचा व बियाण्यांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागासह इतर संबंधित यंत्रणेने दक्ष राहावे तसेच कोणत्याही शेतकऱ्याला येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्वतयारी आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी झाली. यावेळी अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर वृक्ष लागवड या योजनेसाठी शेतकºयांना आवळा, बोर, सीताफळ यासारखी वृक्ष पुरविण्यात यावी, यासाठी वन विभाग व कृषी विभागाने संयुक्तरीत्या प्रयत्न करून ही योजना यशस्वी करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. दरम्यान, यावर्षी बियाणे, खते व कीटकनाशके याबाबत कोणत्याही शेतकºयाची तक्रार येऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी २४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सात भरारी पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. कपाशीचा पेरा वाढणार!यावर्षी कपाशीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत वाढणार आहे. यावर्षी १.६५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड खरीप हंगामात होणार आहे, तर सोयाबीनची लागवड जवळपास १.६५ लाख हेक्टरवर होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांनी दिली. यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव ९० टक्के कमी होईल, असा दावा कृषी विभागाने केला. ६४ हजार क्विंटल बियाण्यांची गरज!यावर्षी ६४ हजार २६१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ६० हजार ५७२ क्विंटल बियाणे महाबीजमार्फत पुरविण्यात येणार आहेत. बीटी बियाण्याची ७ लाख २० हजार पाकिटांची मागणी असून, यामध्ये अजित-११५, मलिका-२०७ व राशी-६५९ या जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी एकूण ८४ हजार ९९० मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खताची व बियाण्याची कोणतीही कमी असणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.