पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करा !
अकाेला: संसर्गजन्य काेराेनाच्या काळात जीव धाेक्यात घालून पत्रकार बांधव कर्तव्य निभावत आहेत. यादरम्यान अनेक पत्रकारांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. पत्रकारांच्या कुटुंबीयांची भावना लक्षात घेता सर्व पत्रकारांना पहिल्या फळीतील कोरोना योद्धे मानून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी साेमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गाेवर्धन शर्मा यांनी शासनाकडे केली आहे.
रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा !
अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आराेग्याची काळजी घ्यावी तसेच रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेउन प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. नागरिकांनी सजग राहून आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करावं तसेच रक्तदान चळवळीतील युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संजय धोत्रे यांनी केले आहे.
खासगी शिक्षकांची उपासमार !
अकाेला : कोरोना विषाणू संसर्गापेक्षाही लॉकडाऊनमुळे समाजावर विपरित परिणाम होत आहेत. काैटुंबिक तणाव वाढीस लागले आहेत. शाळा बंद असल्याने अनेक खासगी शाळेतील शिक्षकांना पगार नाहीत. आता आणखी लॉकडाऊन वाढल्यास त्यांची उपासमार होण्याची शक्यता असून, शासनाने पर्यायी उपाययाेजना करावी, अशी मागणी शिक्षकांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.