अकोला, दि. २४- नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी सोमवारपासून बंद पडली असून, शेकडो वाहनांच्या रांगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लागल्या आहेत. बारदान्याअभावी तूर खरेदी थांबल्याचे सांगितल्या जात आहे; परंतु तूर खरेदी कधी सुरू होईल, याबाबत नाफेडचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. गत काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जिनिंगमध्ये नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंंंत दीड लाख क्विंटल तूर नाफेडने ५0५0 रुपये दराने खरेदी केली. व्यापार्याच्या तुलनेत नाफेडचा दर अधिक मिळत असल्याने, शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावरच तूर विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर शेतकर्यांची प्रचंड गर्दी होत आहे. गत काही दिवसांमध्ये तुरीने भरलेल्या ७५0 ट्रॉली बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. त्यात अध्र्याधिक तुरीची नाफेडने खरेदी केली; परंतु नाफेडकडील बारदाना संपल्यामुळे नाफेडच्या अधिकार्यांनी सोमवारपासून तुरीची खरेदी बंद केली. त्यामुळे सद्यस्थितीत २0 हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत असून, शेतकर्यांचा मुक्काम वाढत आहे, तसेच त्यांच्या मालवाहू वाहनाचेसुद्धा भाडे दिवसागणिक वाढत आहे. बारादाना उपलब्ध झाल्यानंतरच आम्ही तुरीची खरेदी करू; परंतु बारादाना आला नाही, तर आम्ही तूर खरेदीसंदर्भात निश्चित सांगू शकत नाही, असे नाफेडचे अधिकारी शेतकर्यांना सांगत असल्याने, शेतकर्यांना चिंता सतावत आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेली तूर बाजार समितीतील व्यापार्याला विकावी की नाफेडमध्ये विकावी, अशा संभ्रमात शेतकरी पडला आहे.
नाफेडची तूर खरेदी बंद, वाहनांच्या रांगा!
By admin | Published: March 25, 2017 1:45 AM